मोदींवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा : प्रकाश आंबेडकर

71

पुणे / प्रतिनिधी: कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका करतानाच मोदींनी कोरोनाला भारतात आणले असून कोरोनामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी मोदींवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा असे वक्तव्य वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना १४ दिवस कोरोन्टाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता. याला मोदी सरकार जबाबदार असून कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी मोदींविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

तसेच लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ते दुरुस्त करण्याच्या स्थितीमध्ये हे सरकार दिसत नाही. संकटावर संकट येणार असून त्याचबरोबर श्रीमंतांची श्रीमंती वाढणार आहे. गरीब आणखी गरीब होतील.

ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. अशा ठिकाणीही लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांच्या टॅक्समधून येणारा पैसा हा ग्रामीण भागात वापरायचा असतो. प्रत्येक मजुराला काम मिळाले पाहिजे. १० हजार कोटींची गंगाजळ ही टॅक्समधून ग्रामीण भागासाठी येते. ते पैसे वापरण्यात आले पाहिजेत. जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांवर उपासमारीची वेळ येणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.