पर्यटन वारसा जपण्यास आपण किती सक्षम ? सरकार करेल ही भावना न ठेवता आपण काय केले पाहिजे हे तपासून पहिले का ?

148

औरंगाबाद / प्रतिनिधी (शुभांगी भोकरे) : राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक वास्तूंविषयी निर्णय घेण्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया देऊन इतिहास प्रेमींना आणि औरंगाबादकरांना दिलासा दिला आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याआधी काही ठोस निर्णय घेण्याची सध्या गरज आहे. पुरातन वास्तू ढासळत असून त्यांच्याकडे डोळसपणे बघण्याची गरज आज आहे. केंद्र व राज्य सरकारने ही आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी कायमस्वरूपी तरतूद करणे अत्यावश्यक आहे. औरंगाबाद हे एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. अनेक देश – विदेशातून पर्यटक येथील वास्तूंना भेटी देण्यासाठी येत असतात. मात्र आज या ऐतिहासिक पर्यटन वास्तूंची पडझड होत आहे. ५२ दरवाज्यांपैकी काही दरवाज्याची परिस्थिती हे दाखवून देते. ५२ पैकी केवळ ४ मुख्य आणि इतर ९ दरवाजे टिकून आहेत. या वास्तूंविषयी जे सकारात्मक पाऊले उचलले जातीलच मात्र त्याची वाट न बघता शहरवासीयांनी ही पर्यटन वास्तू वाचवण्याचा विचार केला पाहिजे. त्यात पर्यटकांसाठी पर्यटन स्थळांवर अनेक ठिकाणी लावलेल्या सूचना फलकाकडे दुर्लक्ष केले जाते. पर्यटकांसोबत असलेल्या खाद्य पदार्थांचा कचरा तेथे टाकला जातो. यामध्ये भारतीय पर्यटक अग्रेसर असताना दिसून येतात. ही स्थिती बदलायला हवी. नागरिक आपली जवाबदारी ओळखून पर्यटन स्थळांची काळजी घेत राहिले तर ही परिस्थती बदलेल. पर्यावरण संवर्धन आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन हे सर्वांची जबाबदारी आहे. एक दिवस स्वच्छता केली आणि एक दिवस कर्तव्य पार न पाडता, एका दिवसापुरते मर्यादित न राहता नियमित ही सवय अंगीकारणे नागरिकांचे कर्तव्य आहे. आपल्या शहरातील पर्यटन वास्तूंचे आपल्याला मोल कळने हे फार महत्वाचे आहे.

प्रतिक्रिया
महानगरपालिकेवर सतत टीका होत असते. ती काही प्रमाणात योग्य आहे. २००४ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. असीमकुमार गुप्ता यांनी शहराची पर्यटन क्षमता ओळखून पर्यटन कक्ष सुरु केला होता. मनपात कोणी पर्यटन किंवा अन्य कोणताही प्रकल्प घेऊन आला तर यात माझा काय फायदा, मला काय मिळणार हा विचार करतो. प्रत्येकाची हे शहर माझे आहे ही भावना असायला हवी. – डॉ. ज्ञानदा कुलकर्णी (निवृत्त पर्यटन व सांस्कृतिक अधिकारी मनपा) 


पुरातत्व विभाग व सामान्य प्रशासनाच्यावतीने वेळच्यावेळी पर्यटन स्थळांची दुरूस्ती आणि देखभाल करून संबंधित वास्तुंचे संवर्धन करणे गरजेचे आहे. याकडे संबंधित दोन्ही विभाग दुर्लक्ष करतात. विभागाच्या हालगर्जीपणामुळे ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या पर्यटन स्थळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. या ऐतिहासिक वास्तुंचा ठेवा जपण्यासाठी या संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यासाठी आवश्यक ते शर्तींचे प्रयत्न करणे अपेक्षित आहे.- दिपक अंभुरे (पर्यटन व सांस्कृतिक अभ्यासक)


ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन होणे हे काळाची गरज बनायला हवी. आज याच वास्तूंमुळे भारताचे नाव परदेशात पोहचले आहे त्यामुळे तेथील लोक आपल्या शहरात या वास्तू पाहण्यासाठीच येत असता. त्यांना आपल्या शहरातील ५२ दरवाज्यांचे महत्व आणि त्यांची स्थिती हे माहित करून घ्यायचे असते. आपल्या शहरात आल्यावर त्यांना दरवाजाची पडझड झालेली दिसेल तर ते पुढे आपल्या शहरात येतील का ? आणि याचे आपल्या पर्यटन विकासावर काय परिणाम होतील हे लक्षात घेऊन आपण आपल्या शहराची, दरवाजांची प्रतिमा स्वच्छ आणि ठेवण्याची जबाबदारी ही आपल्यावर येते.- अरुण राजगुरू (औरंगाबादकर)

पर्यटन वारसा जपण्यास आपण किती सक्षम ?
१. आपण पर्यटन स्थळांवरील सूचना फलकाचे पालन करतो का ? २. एखाद्या विदेशी पर्यटकाला प्रामाणिकपणे मदत करतो का ?३. फक्त्त मौज-मजा म्हणून भेट न देता ऐतिहासिक स्थळांचा इतिहास जाणून घेतो का ?४. स्वतः स्वच्छता राखून इतरांना ही स्वच्छतेबाबत प्रवृत्त करता का ?५. आपल्या शहरातील ऐतिहासिक स्थळांची सकारात्मक प्रसिद्धी करता का ?

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.